औरंगाबाद: गेल्या काही दिवसापासून शहरातील पाणी प्रश्न पेटत असून,सिडको-हडको परिसरात समस्या अधिक गंभीर असल्याचे दिसून येते. मंगळवारी पवन नगर येथील नगरसेवक नितीन चित्ते यांच्यासह नागरिकांनी मनपा मुख्यालय गाठत आयुक्ताच्या दालनात ठिय्या दिल्या नंतर आज बुधवारी सकाळी महापौर दालनात पाणीपुरवठा विभागाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत संपूर्ण वार्डात समान पाणी द्या, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई करा, गळती थांबवा, टँकर वर नियंत्रण ठेवा, अशा विविध मागण्या नगरसेवकांच्या वतीने करण्यात आल्या. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, मनपा आयुक्त निपुण विनायक, भाजपचे किशनचंद तनवाणी, दिलीप थोरात, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, कीर्ती शिंदे, नितीन चित्ते, ज्योती अभंग, प्रदीप बुरांडे, राहुल रोजतकर, पाणीपुरवठा विभागाचे हेमंत कोल्हे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
जायकवाडी कडून शहरात येणारे पाणी 135 वरून 25 कमी होऊन 110 एमएलडी वर आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणी प्रश्न पेटला असून, सिडको हडको सह काही वसाहतींमध्ये सहा ते आठ दिवसात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मंगळवारी वार्ड क्रमांक 30 पवन नगर येथील भाजपाचे नगरसेवक नितीन चित्ते यांच्यासह नागरिकांनी आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने थेट मनपा मुख्यालय गाठत आयुक्तांच्या दालनात ठिय्या दिला. मनपा आयुक्त पाणीप्रश्नाबाबत ठोस भूमिका घेत नाही, तोपर्यंत आंदोलन माघारी घेणार नसल्याचे भूमिका चित्ते यांनी घेतल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली .त्यानंतर आज बुधवारी पाणीपुरवठा विभागाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत भाजपा नगरसेवकांनी पाणीपुरवठा नियोजनाबाबत प्रशासनावर चांगलाच रोष व्यक्त केला. यावेळी चित्ते यांनी समान पाणी वाटपाची डेडलाईन सांगा असा सवाल प्रशासनाला केला. इतर नगरसेवकांनीही समान पाणी वाटप करा, नासाडी करणार्यांवर कारवाई करा, विविध ठिकाणी असलेली गळती थांबवा शहरात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यावर प्रशासनाचे नियंत्रण नसून, नियंत्रण ठेवावे अशी मागणी नगरसेवकांनी केली.
अन्यथा गुन्हे दाखल करू
शहरात विविध वार्डात मुख्य जलवाहिनीवर ज्या नागरिकांनी नळ कनेक्शन घेतले असतील त्यांनी येत्या तीन दिवसात ते स्वतः काढावे. असे न केल्यास पोलीस सोबत घेऊन मुख्य जलवाहिनी वरून जोडणी घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू असा स्पष्ट इशारा महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिला आहे. यासह या बैठकीत आठ दिवसात वितरण व्यवस्थेत असलेले दोष दूर करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पुढे बोलताना ते म्हणाले निवासी वसाहतींमध्ये पिण्याचे पाणी देण्याकरिता आम्ही प्राधान्य देणार आहोत. तसेच संपूर्ण शहरात समान पाणीवाटप करण्यासंबंधी आयुक्त, अधिकारी यांना सूचना देखील केल्या आहेत. अपव्यय करणाऱ्यांवर योग्य कारवाई होत नाही. हे सर्व दोष येत्या आठ दिवसात दूर करण्यास सांगितले असून, आठ दिवसानंतर पुन्हा एक बैठक घेण्यात येईल. त्यात सुधारणा न दिसल्यास पुढे काय करायचे ते ठरवू असे घोडेले म्हणाले.